चौफेर न्यूज –  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य, कला व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.९ ते ११ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ स्नेहीजनांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवा निमित्त माहिती देताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, दि.९ ते ११ डिसेंबर या कालावधीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य, कला व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये दि.९ रोजी रात्री ८ वाजता रंगभूमीवर गाजवलेले ‘वस्त्रहरण’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. दि.१० रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा, खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात चार नामांकने मिळवलेले ‘नवरी छळे नवऱ्याला’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. दि.११ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके, पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘लेणे प्रतिभेचे’ ही गीत, संगीत, नृत्य, दृकश्राव्य अविष्काराची मैफिल तसेच रात्री ८ वाजता लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ९ डिसेंबर रोजी चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता जिल्ह्यातील जेष्ठ स्नेहीजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवारांच्या ५० वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीस साथ देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रमुख चित्रा वाघ, पुणे जिल्हा महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृष्णराव भेगडे, नानासाहेब नवले, अशोक मोहोळ, मदनशेठ बाफणा, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, शामराव पाळेकर, रमेशचंद्र ढमाले, गंगाशेठ होनराव, दिगंबरशेठ काळभोर, विठ्ठलशेठ काळभोर, श्रीरंग शिंदे, हिरामण बारणे, राम आधार धारिया, श्रीमती सुनिता धुमाळ आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × four =