चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना थेट ढगांमधून स्ट्रॉव्दारे पाणी पुरवठा करण्यात मंजूरी देण्यात आली. तसेच शहरातील १८ लाख कुत्र्यांचा आणि डुकरांचा प्रार्दुंभाव पाहता प्रत्येक नगरसेवकांच्या दारात या प्राण्यांसाठी शौचालये बांधण्याच्या कामास महापालिका सभेत मंजूरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘अभिरूप’ सभेचे (मॉक पार्लमेंट) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर हे महापौरांच्या भूमिकेत होते. तर महापौर राहुल जाधव हे आयुक्त बनले होते. विशेष म्हणजे आयुक्त हर्डीकर यांच्याप्रमाणे राहुल जाधव यांनी दाडी ठेवत नक्कल करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा आज ३६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महापालिकेत अभिरूप सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नगरसेवक अधिकाऱ्यांची भूमिकेत होते तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांची भूमिका बजावली. आयुक्त श्रावण हर्डीकर महापौर झाले होते. तर अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर उपमहापौर, मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे स्थायी सभापती, प्रविण तुपे सभागृह नेता बनले होते. तर दिलीप गावडे विरोधी पक्षनेते, नगरसचिव उल्हास जगताप यांनी विरोधीपक्षातील नगरसेवकांची भूमिका पार पाडली. तसेच महापौर राहुल जाधव आयुक्त, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसचिव, शिवसेना गटनेते राहुल कलाटे सह शहरअभियंता (पाणी पुरवठा), मनसे गटनेते सचिन चिखले यांनी मुख्य सुरक्षारक्षकाची भूमिका पार पाडली.

आजची अभिरूप सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. हास्याचे फवारे, एकमेकांची नक्कल, टाळ्यांचा कडकडाट या सभेत पहायला मिळाला. आजच्या या सभेत (मॉर्क पार्लमेंट) कार्यपत्रिका बनविण्यात आली होती. सभेची सुरूवात ‘आवाज वाढवं डिजे तुला आईची शपथ हायं’… या मराठी चित्रपटातील गाण्याने झाली.

पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना शहराची पाण्याची गरज भागत नसल्याने आणि पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरणातून सोडलेले पाणी रावेत पर्यंत पोहचत नाही. तसेच बंद पाईपने पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी थेट ढगामधून स्ट्रॉव्दारे शुध्द पाणी पुरवठा करण्याचा विषय प्रथम चर्चेला होता. यावरून सभागृहात एकच हाशा पिकला होता. पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता झालेले राहुल कलाटे म्हणाले की, शहरात भविष्यात मेट्रोने पाणी आणण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. शहर दोन भागात विभागले गेलेयं. दोन आमदारांना प्रथम पाणी देऊ, नंतरच नागरिकांचा विचार महापालिकेकडून करण्यात येणार आहे. भविष्यात उजनी धरणातून शहराला बंद पाईपने पाणी पुरवठा करणार आहोत असे वक्तव्य कलाटे यांना सभागृहात करतात एकच हाश्शा पिकला.

अग्निशामक विभागप्रमुख झालेले दत्ता साने म्हणाले, शहरातील पाणी पुरवठ्याकरिता कन्सलटंट नेमण्यात येणार असून तो नागपूरहून येणार आहे. सानेंच्या या टिकात्मक विनोदाने सर्वांनाच हसविले. शेवटी महापौर झालेले श्रावण हर्डीकर यांनी सर्व उपसुचनांसह हा विषय मंजूर केला. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ढग निर्माण करून स्ट्रॉव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येकाची तहान भागली जाणार आहे.

शहरात कुत्र्यांचे आणि डुकरांचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने त्यांच्यावर उचित कारवाई करण्याच्या विषयावर सत्तारूढ पक्षनेते बनलेले प्रविण तुपे यांनी लक्ष वेधले. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी झालेल्या विकास डोळस यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले की, शहरातील कुत्र्यांना आणि डुकरांना त्रास वाढलायं. कुत्री आणि डुकरांसाठी शौचालये बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूरीला ठेवला आहे. त्यामुळे लवकरच शहर हगणदारीमुक्त होणार आहे. आयुक्त झालेल्या राहुल जाधव यांनी प्रशासनाच्यावतीने खुलासा देत या विषयाला मंजूरी दिली. ते म्हणाले की, मी शहरात आल्यापासून अनेक प्रश्न मिटवले आहेत. नगरसेवकांच्या दारात कुत्रे आणि डुकरांसाठी शौचालय बांधण्याच्या विषयाला मंजूरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा आहे. त्यानंतर महापौरांच्या भूमिकेत असलेल्या श्रावण हर्डीकर यांनी या विषयाला मंजूरी दिली. त्यानंतर ही सभा पुढच्या वर्षीपर्यंत तहकूब ठेवण्यात आली. अखेरीस देवा रे.. देवा या गाण्याने सभेचा शेवट झाला.

वास्तविक पाहता या अभिरूप सभेला काहीच महत्व नसते. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा हाच उद्देश या सभेचा असता. दरम्यान या हास्यरूपी अभिरूप सभेत झालेल्या अजबगजब निर्णयाची चर्चा महापालिका वर्तुळात चांगलीच रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 17 =