लोकसभेच्या निकालापूर्वीच शिवसेनेतील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर..!

पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना शहर शिवसेनेत सुरू असलेली ‘धुसफूस’ चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेतील शहर सुधारणा समिती सदस्यांची सोमवारी निवड झाली. त्यात रेखा दर्शिले यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतू निवडीनंतर काही क्षणातच दर्शिले यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. महापालिका सभागृहातच हा सर्व प्रकार घडल्यामुळे शिवसेनेतील गटबाजी समोर आली आहे.

गटातटाचे राजकारण सूरू…

पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि गटनेते राहुल कलाटे असे दोन गट आहेत. गेल्या वर्षभरापासून यांच्यातील गटबाजी कोणत्या ना कोणत्या कारणावरून दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसून आले. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात गटनेते राहुल कलाटे म्हणावे तेवेढे सक्रीय झाले नसल्याचे चित्र होते. बारणे यांनी देखील त्यांची कुठलीच ‘मनधरणी’ करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे राहुल कलाटे यांचे शिवसेनेतील समर्थक नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मिनल यादव, अश्‍विनी वाघमारे, रेखा दर्शिले हे निवडणुकीत बारणेंच्या प्रचारापासून काहीसे दुर राहिल्याचे दिसत होते.

शिवसेनेत धुसफूस वाढली…

म्हणूनच, सोमवारी महापालिकेतील विषय समिती सदस्य निवडीत श्रीरंग बारणे यांनी याचा ‘वचपा’ एकप्रकारे काढला आहे. सदस्य निवडीत बारणे यांनी त्यांच्या समर्थकांचीच प्रामुख्याने वर्णी लावून घेतली. त्यात विधी समितीत प्रमोद कुटे, महिला व बाल कल्याण समितीत अश्‍विनी चिंचवडे, क्रीडा समितीवर निलेश बारणे, आणि शहर सुधारणा समितीत रेखा दर्शिले यांची निवड केली. मात्र रेखा दर्शिले यांनी निवडीनंतर काही क्षणातच त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन टाकला. दर्शिले यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली असून येत्या काही दिवसांत सेनेत आणखीन धुसफूस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजीनाम्याचे कारण अस्पष्ट…

महापालिकेतील विषय समिती सदस्यांची नावे वरिष्ठांकडून आली होती. शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांनी सर्वच समितीवरील सदस्यांची नावे पाठवली होती. रेखा दर्शिले यांनी आपल्या सदस्यत्वाचा का राजीनामा दिला याबाबतची आपल्याला कोणतीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − fourteen =