चौफेर न्यूज –  शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया असतो. ज्यांच्याकडे उत्साह त्यांना यश प्राप्त होते. उत्साह उर्जा देतो व उर्जा कार्य सफल करते. असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषा बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात पिंपरी चिंचवड व मावळ येथील शिक्षकांसाठी कार्यशाळेत बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णा जाधव होते. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, संस्थेचे संचालक विजय जाधव, पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे मुख्य विश्वस्त हनुमंत कुबडे, प्राचार्य बाळाराम पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक अशोक तकटे, ज्ञानदेव दहीफळे, डाॅ.सुजाता बेडेकर, संतोष काळे, नवनाथ तोत्रे,आजीनाथ गु-हाळकर, जगन्नाथ देवीकर, अंजली सुमंत आदी मान्यवर उपस्थित होते.

नाना शिवले पुढे म्हणाले, भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, स्वमत व अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे ही जबाबदारी मराठी भाषेचे अध्यापन करत असलेल्या  प्रत्येक शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांकडून  पाठ्यपुस्तकाच्या आधारे विविध उपक्रम व कृती करून घेतल्या पाहिजेत. जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते.

हनुमंत कुबडे यांनी पाठ्यपुस्तकातील एकूण अभ्यासक्रमाचा धावता आढावा घेतला. त्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व आशावाद निर्माण करु शकतो असे सांगत शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या  क्षमतांचा विकास करावा असे सांगितले.

तकटे म्हणाले , शिक्षकांची भूमिका ही आता मार्गदर्शकाची आहे. प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, पारंपारिकतेकडून ज्ञानरचनावादाकडे आणि पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे  शिक्षकांनी आता जायचे आहे.श्रवण, भाषण-संभाषण,वाचन, लेखन,अध्ययन कौशल्य,भाषाभ्यास ह्या क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायच्या आहेत.पद्य विभाग स्पष्ट करताना रसग्रहणाबाबत आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.

ज्ञानदेव दहीफळे यांनी गद्य आणि स्थूलवाचन याबाबत सविस्तर माहिती देताना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला जीवनज्ञानाची जोड दिली पाहिजे असे सांगत गद्यपाठाचा वाड्मयप्रकार स्पष्ट केला. शिक्षकांनी कायम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृतिपत्रिकेचा आराखडा याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. सुजाता बेडेकर यांनी उपयोजित लेखनात इ-पत्र, बातमी, कथापूर्ती, जाहीरात, सारांश लेखन, निबंधलेखन याविषयी माहीती दिली. पिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत अभ्यासक्रम बदलाची भूमिका व क्षमता क्षेत्रे, गद्य, पद्य, स्थूलवाचन, व्याकरण, उपयोजित लेखन व कृतिपत्रिकेचा आराखडा या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल करपे यांनी केले. प्राचार्य बाळाराम पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 14 =