चौफेर न्यूजगेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ची अखेर घोषणा करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येते. पण हे पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली.

२०१४-१५ साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, २०१५-१६ साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि २०१६-१७ साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही जाहीर करण्यात आला आहे. साहसी क्रीडा प्रकारासाठी नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना पुरस्कार जाहीर झाला. २०१४-१५साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे. एकूण ७७६ अर्ज पुरस्कारांसाठी आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने १९५ पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 14 =