चौफेर न्यूज

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकारचा सावळागोंधळ सुरू असून रोज एक अद्यादेश काढण्यात येत असून जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिला.

धर्माच्या नावावर गुंडगिरी वाढत असून शाहू-फुल्यांच्या विचारांचा वारसा असणारा महाराष्ट्र ही गुंडगिरी मोडून काढल्याविना राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सोमवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आ. पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत शासनावर जोरदार टीका केली. दुष्काळ, नोटाबंदी यामुळे शेतीमालाचे दर पडले असून शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी आमची भूमिका होती. यासाठी विधिमंडळात मागणी करीत अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली होती.

मात्र, कर्जमाफीबाबत केंद्र आणि राज्य शासन एकमेकांकडे बोट दाखवून टाळत होते. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला. सर्व विरोधकांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली. मुंबईचा भाजीपाला आणि दूध बंद होताच शासनाचे डोळे उघडले. मात्र कर्जमाफी केल्याची घोषणा शासनाने केली असली तरी अद्याप याचा एकाही शेतकऱ्याला प्रत्यक्ष लाभ झालेला नाही. दीड लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अगोदर पसे भरा मगच कर्जमाफीचा लाभ देतो, असे सांगितले जात आहे. जास्तीचे पैसे असते तर मग कशाला कर्जमाफी मागितली असती, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे का, केवळ जाहीरातबाजी करून श्रेय घ्यायचे काम केले जात असून हे कसले राजकारण असा सवाल यावेळी पवार यांनी उपस्थित केला. शेतकरी कर्जमाफी याबाबत नेमके शासनाचे धोरण काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.

शासन रोज एक अद्यादेश काढत असून सुधारणा करण्यात येत असल्याचे एकीकडे सहकार मंत्री सांगत आहेत. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी केली म्हणून स्वतच पाठ थोपटून घेणारे शासन प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय देत आहे याचा जाब विचारला जाईल. जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या होते, हैद्राबादमध्ये रोहितला आत्महत्या करावी लागली. वेगवेगळी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली. काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आज केवळ स्विस बँकेतील खात्यावर जमा होणारे पैसे निम्म्यावर आल्याचे सांगत दिशाभूल केली जात आहे. काळा पैसा परत आणण्याचे काय झाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काय झाले याची उत्तरे भाजपाने द्यावीत असे सांगून भाजपा-शिवसेना एकमेकांवर केवळ आरोप-प्रत्यारोप करीत असून यातून सामान्य माणसाच्या हिताचे कोणतेच निर्णय होत नसल्याचा आरोपही श्री. पवार यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − thirteen =