कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन

धुळे : जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांनी शेतकऱ्यांना कमी कालावधीत चेकबुक उपलब्ध करुन द्यावे. तसेच कॅशलेस व्यवहार होण्यासाठी शेतकरी, कृषी निविष्ठा विक्रेते, शेतमाल खरेदीदार यांनी आता इ- बँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कृषी निविष्ठांची खरेदी करताना ऑनलाइन पध्दतीने रक्कम अदा करणेबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक जी. डी. देशमुख यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी,  कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे म्हणाले, शेतऱ्यांनी ज्या कृषी सेवा केंद्रांकडून किंवा वितरकाकडून खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करावयाची आहेत त्या दुकानांशी संपर्क साधून खरेदी करावयाच्या निविष्ठांचे कोटेशन उपलब्ध करुन घ्यावे.

तसेच या कोटेशनमध्ये बँकेस आवश्यक तपशील नमूद करुन घ्यावा. जेणेकरुन विक्रेत्यांच्या खात्यात शेतकऱ्यांची रक्कम जमा करता येईल.

कृषीमाल खरेदीदार शेतकऱ्यांना एनईएफटी, आरटीजीएस, मोबाईल बँकिंग, नेटबँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठवू शकतात. त्याचाही जास्तीत जास्त वापर शेतकरी, कृषी माल खरेदीदार व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी करावयाचा आहे. स्वाइप मशीनचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

रब्बी पीक कर्जाचे पुनर्गठण तत्काळ करुन द्यावे. तसेच तालुकास्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती, वितरकांच्या सहकार्याने जनजागृतीपर उपक्रम राबवावेत.

श्री. गिलाणकर यांनी सांगितले, चेकबुक तत्काळ उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व बँकांच्या समन्वयकांना कळविले आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ही परिस्थिती लवकरच निवळेल. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी ऑनलाइन बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असे सांगितले.

एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक सचिन भास्कर यांनी स्वाइप मशीनविषयीची माहिती दिली, तर श्री. देशमुख यांनी नेटबँकिंग, ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर, त्याबाबत घ्यावयाची दक्षता याविषयी सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी किमान चलन उपलब्ध करुन द्यावे, अशी अपेक्षा कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सांगळे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करुन आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 11 =