चौफेर न्यूज – राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा पदकांचा धडाका सुरुच आहे. नेमबाज श्रेयसी सिंहने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या (बुधवारी) दिवसातील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी नेमबाज ओम मिथरवालने ५० मीटर पिस्तुल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. श्रेयसी सिंहने अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सचा पराभव केला. इमा कॉक्स सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र शूट ऑफमध्ये दोन्हीवेळा अचूक निशाणा साधत श्रेयसीने सुवर्णपदकावर नाव कोरले. तर मोक्याच्या क्षणी इमाचा निशाणा चुकल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

निर्णायक क्षणी खेळ उंचावणारी श्रेयसी राष्ट्रकुल स्पर्धेच्या डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही श्रेयसी सिंह सहभागी झाली होती. मात्र त्यावेळी तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. इंग्लंडच्या शार्लेट केरवूडने श्रेयसीला मागे टाकत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे श्रेयसीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदाच्या स्पर्धेत श्रेयसीने संपूर्ण अनुभव पणाला लावत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 14 =