क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे

पिंपरी–  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीमध्ये सुरू करण्यात आलेल्या संगीत अकादमीतील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. या समस्यांकडे महापालिकेने मात्र दुर्लक्ष केले आहे. अकादमी चांगल्या प्रकारे चालवायची असेल, तर अकादमीच्या वास्तूमध्ये विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. त्यानूसार कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी संगीत अकादमीस आज (मंगळवार) भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी अकादमीस वाद्य, अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी तेथील कर्मचा-यांना दिले. यावेळी संगीत अकादमीचे शिक्षक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील मुलांना तबला, हार्मोनिअम वादनासह शास्त्रीय व सुगम गायनाचे धडे सहजासहजी मिळावेत, उच्च दर्जाचे सांगीतिक शिक्षण मिळावे, उत्तमोत्तम कलावंत घडावेत, शहराचा सांस्कृतिक दर्जा उंच व्हावा, या उद्देशाने महापालिकेने २००१ मध्ये संगीत अकादमीची स्थापना केली. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत गुरुकुल पद्धतीने संगीत अकादमीचे काम सुरू आहे. तिचे मुख्यालय निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीत आहे. चिंचवड, शाहूनगर व संत तुकारामनगर या तीन शाखा आहेत. तेथे विद्यार्थ्यांना गायन व वादनकला शिकवली जाते.

तेथील कर्मचा-यांनी अकादमीचे मुख्य सभागृह वातानुकूलित करण्यात यावे, वास्तूच्या प्रत्येक दालनात अद्ययावत फर्निचर उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या तसेच कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारे गालिचे उपलब्ध करून द्यावेत, शिकवायला येणाऱ्या शिक्षकांसाठी चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संस्थेच्या नित्य कामाच्या दृष्टीने काही नवीन वाद्यांची खरेदी करणेही आवश्यक आहे. त्या बरोबरच संस्थेत सध्या असलेल्या जुन्या वाद्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याचीही व्यवस्था करावी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संस्थेत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी संगीत व अन्य क्षेत्रातील मंडळी येत असतात. या पाहुण्यांना बसण्यासाठी देखील चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे. संस्थेच्या वास्तूतील खिडक्यांची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच स्वागत कक्ष तयार करावा, अकादमीसाठी पूर्ण वेळ लिपिक मिळावा, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.

या संगीत अकादमीत अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांपर्यंतच्या व्यक्तींना अकादमीत प्रवेश दिला जातो. त्यांना संगीताचे धडे देण्यासाठी स्मिता देशमुख, नंदीन सरीन, वैजयंती भालेराव (गायन), समीर सूर्यवंशी, विनोद सुतार, संतोष साळवे (तबला) आणि उमेश पुरोहित, मिलिंद दलाल, वैशाली जाधव (हार्मोनिअम) हे शिक्षक कार्यरत आहेत. अकादमीसह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संगीत कलेचा प्रचार व प्रसार सुरू असून, शहराचे सांस्कृतिक वैभव उंचावत आहे.

दरम्यान, निगडीतील संगीत अकादमीच्या समस्यांचा आढावा घेतल्यानंतर तेथील प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यात येतील, तसेच फर्निचर, कलावाद्य, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था अद्यावत करण्यासाठी लवकरच निर्णय घेवू, तसेच सांगवीच्या निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात नव्याने संगीत अकादमी सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन संगीत अकादमी सुसज्ज करण्याचा निश्चित प्रयत्न करु, असे आश्वासन क्रीडा सभापती तुषार हिंगे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 17 =