स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला – पुष्प तिसरे

 चौफेर न्यूज : संस्कार हे माणूस घडवणारे औषध आहे, असे प्रतिपादन सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक 11 जानेवारी 2019 रोजी केले. श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित चार दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘चला आता माणूस घडवू या!’ या विषयावरील तृतीय पुष्प गुंफताना प्रा.हंकारे बोलत होते. यावेळी नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक संतोष मोरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, पोलीस निरीक्षक शंकर औताडे, वास्तुविशारद राजेंद्र कोरे, दिलीप वेदपाठक आणि प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रामराजे बेंबडे उपस्थित होते.

मारुती भापकर यांनी, अतिप्राचीन काळापासून अनेक महापुरुषांनी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील आजही माणूस घडवण्यासाठी प्रबोधनाची गरज पडते; कारण देशात अनेक विचारधारा आहेत! असे विचार मांडले. मंगला कदम यांनी, नवीन पिढी घडवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करून व्याख्यानमाला चालवाव्या लागतील! असे मत व्यक्त केले.

प्रा.वसंत हंकारे म्हणाले की, आज आम्ही समाजात ताठ मानेने फिरतो यामागे सर्व महापुरुषांचे कर्तृत्व आहे. समाजातील लेकी शिकल्या पाहिजेत या अंत:करणातील उत्कट प्रेरणेने सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले. असे असूनही आजच्या एकविसाव्या शतकात ‘बेटी बचाओ!’ , ‘बेटी बढाओ!’ असे समाजप्रबोधन करावे लागते. अनेक पदव्या मिळवून आम्ही उच्चशिक्षित झालो असलोतरी माणूस म्हणून आम्ही जगतो का, याचा अंतर्मुख होऊन विचार करा. भौतिक संपत्ती कमावण्याच्या नादात आम्ही आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहे हेच विसरतो आहोत. आमच्या मुलांसमोर आम्ही नव्वद टक्के गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवतो; आई-वडिलांची मान ताठ राहील असे जगण्याचे संस्कार का देत नाही? पैशाने फक्त वस्तू विकत घेता येतात, समाधान नाही याची जाणीव मुलांना द्यायला हवी. मुलाला जन्म देणारी आई ते मूल कसेही असले तरी स्वीकारते; पण तोच मुलगा मोठेपणी वृद्ध आई-बापाचा स्वीकार करण्याऐवजी त्यांची वृद्धाश्रमात रवानगी का करतो? कारण आम्ही मुलांना केवळ बाह्यरूपाचे दिसणे शिकवलेले असते; पण आतला माणूस वाचायला शिकवत नाही. नेहमी मुखवटे घालून आम्ही वावरत असतो. तंत्रज्ञानाच्या बळावर एका क्षणात आम्ही जगाच्या दुसर्‍या टोकाशी असलेल्या माणसाशी संपर्क साधू शकतो; पण आपल्या जवळ असलेल्या माणसांशी संवादाचा अभाव असतो. शत्रूदेखील ज्यांच्या चारित्र्याची हमी द्यायचा, असे शिवबा जिजाऊंनी घडवले. जोपर्यंत वास्तववादी आत्मप्रतिमा मुलांच्या ह्दयात उमटत नाही, तोपर्यंत भारत महासत्ता होऊ शकत नाही. निसर्गाचा नियम असा आहे, की जे तुम्ही पेरता तेच उगवून कैक पटीने तुमच्याकडे येते म्हणून संस्कारांचे बीज पेरून आपल्या मुलांना दुसर्‍यासाठी आणि समाजासाठी जगायला शिकवा!

अभिनिवेशपूर्ण अशा खणखणीत आवाजातील अनौपचारिक शैलीत आपल्या व्याख्यानविषयाचे विवेचन करताना छत्रपती शिवराय, संत गाडगेबाबा, सानेगुरूजी, सयाजीराव गायकवाड यांचे जीवन संदर्भ उद्धृत करीत तसेच विनोद आणि गांभीर्य यांचा समतोल साधत प्रा.वसंत हंकारे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

व्याख्यानापूर्वी, वैशाली चौधरी आणि सहकारी यांनी ‘स्वरसंवाद’ कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय आणि सुगम संगीत सादर केले. भालचंद्र सोहनी यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात महेंद्र माकोडे, प्रमोद सोनवणे, राजेश चिट्टे, दिलीप मांडवकर, मंगेश पांडे, महेश मांडवकर यांनी परिश्रम घेतले. अविनाश आवटे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − fifteen =