चौफेर न्यूज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या विश्वविक्रमाचे कौतुक केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये रंगलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर श्रीलंकन फलंदाज अकीला धनंजयाला बाद करत महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील शंभरावे यष्टीचित केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत असा करिश्मा करणारा धोनी एकमेव यष्टीरक्षक आहे. आतापर्यंत कोणत्याही यष्टीरक्षकाने यष्टीमागे उभे राहून शंभर फलंदाजांना बाद करण्याचा करिश्मा केलेला नाही. धोनीने यष्टीमागे सुरेख कामगिरी करत दिमाखात हा विश्वक्रम नोंदवला. या सामन्यात धोनीने दोन झेल, एक रन आउट आणि एक यष्टीचित करत चार श्रीलंकन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

धोनीच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरु झालाय. सचिनने ट्विटरच्या माध्यमातून धोनीच्या चपळ क्षेत्ररक्षणाला सलाम केला. धोनीच्या चपळाईला सचिनने विजेची उपमा दिली आहे. त्याने ट्विटवर लिहिलंय की, “वीज केवळ एकदाच चमकताना दिसते, असं कोण म्हणेल? आज आम्ही शंभराव्यांदा वीज चमकताना पाहतोय. वेल डन एम.एस. धोनी.” यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ९९ फलंदाजांना यष्टीचित केले होते.  श्रीलंकेचा कालूवितरणाने ७५ फलंदाजांना यष्टीचित केले असून, तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर ७३ फलंदाजांना यष्टीचित करुन पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोईन खान चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा अ‍ॅडम गिलख्रिस्ट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ५५ फलंदाजांना यष्टीचित केले आहे. त्याच्यानंतर भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगियाचा समावेश आहे. भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करताना मोंगियाने ४४ फलंदाजांना बाद केले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या यष्टीमागील कामगिरीची चर्चा तशी नवी नाही, मात्र शतकी यष्टीचितने रचलेला विश्वविक्रमाचे कौतुक करावे तितके कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =