चौफेर न्यूज – “सत्याचे विश्व वेगळे आणि कलेचे विश्व वेगळे असते. माणसं सत्याच्या विश्वाला कलेचे विश्व समजात. पण, सत्याच्या विश्वाला कलेच्या विश्वात आणून ठेवतो आणि सत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार”, अशा शब्दांत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी कलाकाराची व्याख्या चिंचवडमध्ये केली.

कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘कलासंगम सोहळा २०१८’ सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, सिने अभिनेत्री आशा काळे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, हरहरे हेमंतराव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आश्विनी जाधव, प्रियंका बारसे, शितल शिंदे, बाबू नायर, कैलास कुटे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, उमा खापरे, शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे, प्रवचनकार मधू जोशी, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

या निमित्त भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण एवलेकर, तेजश्री अडीगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर, सुनिल शेगावकर, लक्ष्मण गावंडे, विश्वास करंदीकर, आणि नाना शिवले यांना विशेष कलागौरव पुरस्कार, तर शहरातील १५० कलाकारांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले, शहरामध्ये कला, संगीत, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणा-या अनेकांचा हा सत्कार समारंभ आहे. दुरदृष्टीने या शहराची सांस्कृतिक वाटचाल होते आहे. वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे अभिनय, कला, उद्योग अशा पाकळ्यांचे एकच फूल या रंगमंचावर मला अनुभवता आले. कलेच्या माध्यमातून सुर्याशी व गंगेशी नाते जोडणा-या सर्वांना अभिवादन करण्याची ही संधी आहे. उद्योगनगरी ही सांस्कृतिक व कलानगरी व्हावी, ही अपेक्षा सर्वांची आहे. ही कलाकारांची देखील जबाबदारी आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करून सौदर्य निर्माण केले. त्याला पाहून माणूस हसायला, बोलायला, डोलायला लागला. त्यातूनच वेगवेगळ्या कलेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे कला म्हणजे विश्वचैतन्याचा शोध घेणे होय. कलाकार वास्तवाला सौदर्य देवून कलेला सौदर्याने नटवतात. राजकारणातील रंग बदलतात, पण कलेतील रंग बदलत नाहीत, असेही देखणे म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, औद्योगिकनगरीची सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल होत आहे. ही चळवळ शहरात भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केली. त्यांना खांद्याला खांदा देऊन अमित गोरखे यांच्यासारखे अनेक जण मिळून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पुरस्कारामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेतून इतिहासाची पाने वाढविण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, कलेला कोणताही जात, धर्म नसतो. शहराच्या वाटचालीत भर टाकणारे अनेक कलाकारांचा हा सन्मान सोहळा आहे. शहराची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम आम्ही करतो आहोत. त्यासाठी अनेक कलाकारांनी इथे येऊन वेळोवेळी चेतना दिली आहे. शहरातील लोकसंख्या वाढली असून अनेक सांस्कृतिक संस्थाही वाढल्या आहेत. संस्कारातून सुसंस्कृतपणे अनेक कलाकार निर्माण होत असून अनेक जण शहरातील कला क्षेत्रासाठी काम करत आहेत.

प्रास्ताविक करताना अमित गोरखे म्हणाले की, १९९८ साली कलारंगची स्थापना केली. आज २० व्या वर्षात संस्थेने पदार्पण केले आहे. संस्थेतर्फे दिला जाणार कलागौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. आज अखेर ३५६ कलाकारांना या पुरस्काराने गौरव झालेला आहे. चित्रपट, नाटक आणि कला क्षेत्रातील नामवंत १७६ कलाकारांनी कलारंगच्या कार्यक्रमांना प्रेमापोटी उपस्थिती लावली. स्थानिक कलागारांना वाव मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.  सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घातली. त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.

सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवडमधील स्थानिक कलाकारांच्या मराठी गाणी, नृत्याच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरोज राव यांनी सूत्रसंचालन केले. कलारंगचे उपाध्यक्ष शैलेश लेले, महेश नलावडे, दिनेश देशमुख यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =