चौफेर न्यूज – चांगल्या समाजासाठी समर्थ नागरीक घडविणे आवश्यक असून हे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते. यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिक्षण विभाग (प्राथमिक) व डीआयईसीपीडी पुणे आयोजित मनपास्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते.

मंगळवार दि. ११ रोजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी येथील कार्यक्रमास माजी आमदार भगवान साळुखे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षण समिती सदस्या अश्विनी चिंचवडे, शारदा सोनवणे, सुवर्णा बुर्डे,‍ संगिता भोंडवे, विनया तापकीर, उषा काळे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, सागर हिंगणे, डीआयईसीपीडी च्या प्राचार्या डॉ.कमलदेवी आवटे, विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत, व्याख्याते डॉ.अमोल जोग, दामिनी मयेनकर, प्रशांत शेवळकर, डॉ.वर्षा डांगे, आदी उपस्थित होते.

दिप प्रज्वलन व वृक्षांना पाणी देऊन परिषदेचे उदघाटन करण्यात आले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोणत्या विषयामध्ये विदयार्थ्याला जास्त आवड आहे ते ओळखले पाहिजे व त्यानुसार त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच अप्रगत मुले शोधून त्यांच्याशी संवाद वाढवून त्यांच्यातील संबधीत विषया बाबतची भिती दूर केली पाहिजे अप्रगत हा शब्दच काढून टाकला पाहिजे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यम म्हणजे काय तर संवाद साधण्याचे माध्यम आहे. त्यामुळे सुसंवाद वाढला पाहिजे असेही ते म्हणाले.

उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, महाभारतापासून गुरु व शिष्याची पंरपरा चालत आलेली आहे. गुरुंनी शिष्यामधील चांगला गुण ओळखून त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम करायला पाहिजे तसेच शिक्षणामध्ये नवनविन बदल करुन आधुनिक पध्दतीने सुधारणा केल्या पाहिजेत त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावून शहराचा नावलौकीक होईल या प्रमाणे कामकाज करावे. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सर्व मुख्याध्यापकांना वाटले पाहिजे की माझी शाळा ही शहरात सर्व बाबतीत पहिल्या क्रमांकावर कशी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पूर्वी ७० हजार पटसंख्या होती ती आता ३७ हजारावर आली आहे. खाजगी शाळेची पटसंख्या जास्त का वाढतेय व आपली पटसंख्या झपाटयाने कमी का होते. याचा विचार मुख्याध्यापकांनी करावा शिक्षकांनी मोठया आत्मविश्वासाने, उत्साहाने मुलांना नाविण्यपूर्ण शिक्षण देउन देशाचा चांगला नागरीक तयार करण्याचे काम केले पाहिजे. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे म्हणाल्या, सर्व शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. त्याच प्रमाणे सर्व शाळेतील मुलींना स्वयं संरक्षणाचे प्रशिक्षण देणार आहे. त्याचप्रमाणे मनशक्ती लोणावळा येथील क्रेंद्रा मार्फत मोफत कार्यशाळा घेणार आहे. त्यामध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासाचा ताण कसा दूर करावा, स्मरणशक्तीत कशी वाढ करावी इ. व विदयार्थ्यांच्या समस्या सोडणयाचा प्रयत्न्‍ करणार आहे. तसेच प्रत्येक शाळेची साफसफाई, स्वच्छता, व पिण्याचे पाणी इ सोयीवर देखील लक्ष केंद्रीत करणार आहे.

डीआयईसीपीडी च्या प्राचार्या डॉ.कमलदेवी आवटे म्हणाल्या, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. संवादाने प्रश्न सुटतात त्यामुळे सुसंवाद साधला पाहिजे. विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत म्हणाल्या, की माझे प्राथमिक शिक्षण या महापालिकेच्या शाळेत झाले आहे. याचा मला सार्थअभिमान वाटतो. सर्व मुख्याध्यापकांचा कार्यकाळ चांगला व यशस्वीरीत्या कामकाज केल्यास भविष्यात त्यांचा नावलौकीक होते. डॉ.अमोल जोग यांनी शिक्षकांची आव्हाणे व त्यांची बलस्थाने या विषयावर मुख्याध्यापकांशी संवाद साधला.

माजी आमदार भगवान साळुंखे यांनी शिक्षण संघटन, शिक्षण चळवळ, स्वांतत्र्यपूर्व शिक्षणाचा काळ, गॅट करार इ. गोष्टींवर प्रकाश टाकला. व्याख्याती दामिनी मयेंनकर यांनी, मॉडर्न शाळा प्रकल्प कसा तयार केला व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे सोबत कसे काम करुन घेतले जाते या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्याते प्रशांत शेवळकर यांनी चित्रफित दाखवून मुख्याध्यापकांना चांगल्या प्रकारे संवाद साधुन मुख्याध्यापक व शिक्षकांना विचारमंचावर बोलवून त्यांच्या सोबत शाळा सिध्दीवर प्रात्येक्षिके सादर केली. डॉ.वर्षा डांगे यांनी गोवर, रुबेला लसीकरणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन अविनाश वाळुंज यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =