भाजप नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन…

चौफेर न्यूज –  प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून तसेच द्वेष आणि मत्सरापोटी स्मशानभूमी तसेच रस्त्यांची कामे अडविली आहेत. स्मशानभूमी सारख्या भावनिक मुद्द्यावर शितोळे राजकारण करत आहेत. त्याला भीक न घालता प्रशासनाने सांगवी भागातील रस्त्यांची कामे तसेच स्मशानभूमीचे काम पूर्ण करून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागाच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक ढोरे, कांबळे व नगरसेविका सोनवणे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेने गेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक ३२ मध्ये स्मशानभूमी उभारली आहे. या प्रभागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमीची आवश्यकता होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करून नागरिकांसाठी स्मशानभूमी बांधली. परंतु, त्यासाठी बसविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीत मयताच्या टाळूवरचे लोणे खाण्याचा प्रकार झाल्यामुळे या प्रभागाची प्रचंड बदनामी झाली. या भ्रष्टाचाराचे पाप संबंधितांना फेडावे लागले. ही स्मशानभूमी बांधताना त्याला कोणीही आडकाठी आणली नाही. परंतु, महापालिका निवडणुकीतील जय-पराजयानंतर स्मशानभूमीवरून नागरिकांना वेठीस धरण्याचेकाम सुरू आहे. पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून शितोळे याभागात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या स्मशानभूमीचे काम अडविले आहे. सार्वजनिक असलेल्या रस्त्यांचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी रस्त्यांची  कामे त्यांनी अडविली आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मत्सर आणि द्वेषापोटी नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. या सर्व अडवाअडवीच्या राजकारणामुळे याभागातील नागरिक आगामी काळात त्यांचे जिरवण्याचे काम निश्चित करतील. परंतु, या राजकारणाला महापालिका प्रशासनाने बळी न पडता प्रभाग क्रमांक ३२ मधील कामे गतीने मार्गी लावावीत.

या भागातील सर्वच कामांसाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. लोकहिताच्या कामासाठी कोणाच्या दबावाला बळी पडण्याची अधिकाऱ्यांना  गरज नाही. त्यामुळे या बाबीची आपण स्वतः गंभीर दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांना कामे मार्गी लावण्यासाठी आपण आदेश द्यावेत. प्रभागातील नागरिकांची तातडीची गरज लक्षात घेऊन स्मशानभूमी उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. रस्त्यांची कामे अडविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाने संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी. यापुढे विकासकामे अडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा या चारही नगरसेवकांनी दिला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 1 =