चौफेर न्यूज –   पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे. हे उपोषण सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायत पिंपरी चिंचवड, सस्कार प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन, ‘इ’ पिंपरी चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन ऑफ घरकुल आणि जलदिंडी प्रतिष्ठान या संघटना लाक्षणिक उपोषणात सहभागी होणार आहेत.

पिंपरी चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 17 =