चौफेर न्यूज  – शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या अभ्यासू व आक्रमक ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसेवक तसेच भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बुधवारी (दि. १२) भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या बड्या नेत्या आहेत. थेट मातोश्रीशी संपर्क असल्यामुळे शिवसेनेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे. तसेच त्या पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची बाजू भक्कम आणि कणखरपणे मांडताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पाहत असतो. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. गोऱ्हे यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसेवक तसेच भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे कनिष्ठ बंधू शंकर जगताप आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी ही भेट घेत शुभेच्छा दिल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या वर्षी देखील आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने शिवसेनेत गदारोळ माजला होता. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच खडाजंगी झाली होती. बारणे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या पक्षातील अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे जगताप व गोऱ्हे भेटीने खासदार बारणे घायाळ झाल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + 9 =