चौफेर न्यूज – ग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकत्र येण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनात १७ पक्ष सहभागी होणार आहेत. मात्र बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चारही नेते या स्नेहभोजनात सहभागी होणार नसल्याचे समजते आहे. असे असले तरीही हे चारही नेते आपले प्रतिनिधी या स्नेह भोजनासाठी पाठवणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या विरोधकांना आपल्या सोबत आणण्यासाठी सोनिया गांधी प्रयत्न करणार आहेत. त्या अनुषंगाने त्या आज सगळ्या विरोधकांशी चर्चा करतील अशी माहिती समोर आली आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत सगळे पक्ष आले तरच भाजपाला टक्कर देता येईल हे सोनिया गांधी यांना अधोरेखित करायचे आहे त्याचमुळे ही डिनर डिप्लोमसीची खेळी त्या खेळत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

असे असले तरीही या स्नेहभोजनासाठी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी न येणे हा सोनिया गांधी यांच्यासाठी काहीसा अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी उभी राहण्यापेक्षा सगळ्या विरोधकांनी एकवटले पाहिजे तर त्यांना टक्कर देता येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दिली आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली असली तरीही गुजरात वगळता ते ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ते प्रभाव पाडू शकलेले नाहीत. देशातील २० पेक्षा जास्त राज्ये भाजपाने काबीज केली आहेत. तर चार राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता उरली आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधून आपण त्याचे नेतृत्त्व करायचे हे सोनिया गांधी यांनी ठरवलेले दिसते आहे. मात्र काँग्रेसची धुरा राहुल गांधींच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय बहुदा शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांना पटला नसावा म्हणून ते या डिनर डिप्लोमसीपासून स्वतःला दूर ठेवत आहेत अशीही एक चर्चा ऐकायला मिळते आहे. अशात आता मंगळवारी सोनिया गांधी काय म्हणतात? सगळ्या पक्षांसोबत काय चर्चा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. २०१४ पूर्वी देशात विकास झालाच नाही का? भारत हा देश एक कृष्णविवर होता का? असा खोचक प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय होईल असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळेच आज त्या काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 2 =