चौफेर न्यूज – इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या सौरभ चौधरीने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. १६ वर्षीय सौरभने ऐतिहासीक कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली आहे. या कामगिरीनंतर सौरभच्या मेरठ येथील घरात त्याच्या पालकांनी एकच जल्लोष केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सौरभला ५० लाखांचं बक्षिस जाहीर केलं आहे.

सौरभचे वडील हे शेतकरी आहेत. मात्र वयाच्या १३ व्या वर्षी छंद म्हणून नेमबाजीकडे वळलेल्या सौरभने भारताचं नाव खऱ्याअर्थाने उंच केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सौरभच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. “माझ्या मुलाने केलेल्या कामगिरीचा आम्हाला आनंद आहे. सौरभचे वडील त्याच्या अभ्यासासाठी नेहमी चिंतेत असायचे, मात्र सौरभने नेमबाजीचा सराव करणं कधीही सोडलं नाही. त्याच्या याच निष्ठेचं फळ त्याला मिळतय.” आपल्या मुलाचं कौतुक करताना सौरभच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − 4 =