चौफेर न्यूज – देशभरात सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळी अमिष आणि इमेल पाठवून कोट्यवधींची फसवणूक केली जात असताना  पुणे पोलिसांनी हिंजवडीतल्या कंपनीचे तब्बल 2 कोटी 90 लाख वाचवले आहेत. चीनमधील कंपनीशी सुरू असलेल्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात सायबर भामट्याने चीनच्या कंपनीचा हुबेहुब इमेल आयडी तयार करून हिजंवडीतल्या कंपनीला पाठविला. या ई-मेलमधील खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार कंपनीने रक्कम पाठवून दिली. मात्र फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर कंपनीने सायबर गुन्हे शाखेशी लागलीच संपर्क साधला. त्यामुळे पोलिसांना तत्काळ पैसे परत मिळवून देण्यास यश आले आहे.

याप्रकरणी हिंजवडी येथील कंपनीकडून सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यात आली होती. संबंधित कंपनी नामांकित असून, जगभरातील दुचाकी, चारचाकी वाहनांचे हेड लाईट बनवतात. त्यासाठी त्यांना कच्चा माल लागतो. इतर देशातून कच्चा माल मागवला जातो.  दरम्यान कंपनीला मशिनरी घ्यायची असल्याने त्यांनी चीनमधील एका कंपनीला इमेल पाठवून चौकशी केली. मशिन खरेदीची अ‍ॅडव्हान्स रक्कम म्हणून काही रक्कम  देण्याचे ठरले. मात्र, या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवून असलेल्या हॅँकरने चीनमधीलऑर्डर दिलेल्या कंपनीच्या नावाचा हुबेहुब इमेल आयडी तयार केला व तो   हिंजवडीतल्या कंपनीला पाठविला. परचेस इनव्हाईसवरील बँक खात्यात बदल झाला आहे. अ‍ॅडव्हान्स रक्कम इतर बँकेत भरा असे ई-मेलमधध्ये नमूद केले.   कंपनीनेही  2 कोटी 90 लाख रुपये स्वीफ्ट ट्रान्सफर (आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे पाठविण्यासाठी स्वीफ्ट ट्रान्सफरचा वापर केला जातो) केले. तसेच, ऑर्डर दिलेल्या चीनच्या कंपनीला रक्कम मिळाल्याबाबत खात्री केली. त्यावेळी रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले.

त्यानंतर कंपनीने तत्काळ पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे क तक्रार केली. सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे, जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने बँकेचे डिटेल्स घेऊन चीनमधील पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्याची माहिती मिळवली. चीनच्या पोलिसांशी संपर्क केला. त्यांच्या सहकार्याने तेथील बँकेला पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच, संबंधित खात्यावर ट्रान्सफर झालेली रक्कम परत हिंजवडीतील कंपनीच्या खात्यावर परत मिळवली. त्यामुळे या कंपनीचे तब्बल 2 कोटी 90 लाख रुपये वाचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × four =