चौफेर न्यूज –  हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी यासंदर्भात पवारांची भेट घेऊन कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी याप्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मयुर कलाटे यांनी दिली.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत नगरसेवक कलाटे यांनी शिष्टमंडळासह शरद पवार यांची भेट घेतली. हिंजवडीत होणा-या वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सांगितली. तसेच दीर्घकालीन तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले. त्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. शिष्टमंडळात हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जाधव होते.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. आयटीयन्सना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मयूर कलाटे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्कची स्थापना पवार यांनी केली आहे. त्यांच्यामुळे हिंजवडी गावाचे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यांना हिंजवडीतील वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सविस्तर सांगितली. त्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्ती बैठक घेण्यात येईल, असे पवार साहेबांनी सांगितले. तसेच यामध्ये शरद पवार संयुक्त बैठक घेणार आहेत. आयटीपार्क येथे होणा-या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत उपाय काढण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =