चौफेर न्यूज- जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याची म्हटली जाणारी आलिशान मर्सिडिझ गाडी लिलावात निघणार आहे. अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात पुढच्या वर्षी हा लिलाव होणार आहे. हिटलरने केलेल्या यहुदींच्या हत्याकांडाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी या लिलावातील 10 टक्के रक्कम खर्च होणार आहे.

मर्सिडिझ-बेंझ 770के मॉडेलची ही विंटेज गाडी हिटलरच्या खासगी गॅरेजमधील असून ती 1939 साली बनविलेली आहे. “सुपर मर्सिडिझ” तसेच ग्रोस्सर नावाची ही कार सैन्य संचालनात वापरली जात होती. इटालीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या जर्मनी दौऱ्यामध्ये आणि फ्रान्सवर आक्रमण केल्यानंतर या गाडीचा वापर करण्यात आला होता. वर्ल्डवाईड ऑक्शनीअर्स नावाची कंपनी ही गाडी विकणार आहे.

“ही कार खुद्द अॅडॉल्फ हिटलरशिवाय अन्य कोणीही वापरलेली नाही,” असे कंपनीने म्हटले आहे.

ही सुपर-मर्सिडिझ खास नाझी हुकूमशहासाठी बनविण्यात आली होती. त्यासाठी नाझी अधिकारी व हिटलरचा चालक एरिख केम्पका याने खास तपशील पुरवले होते.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर ही कार अमेरिकी फौजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून फ्रान्समध्ये नेण्यात आली होती. नंतर ती अमेरिकेला नेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + 10 =