अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’च्या आर्ची-परशाच्या ‘सैराट’ने सर्वांनाच याड लावलं. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडलाही याड लावलं होतं. दिग्दर्शक करण जोहरलाही चित्रपटाने भुरळ पाडली असून त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतल्याची चर्चा आहे.

‘सैराट’ सुपर – डुपर हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र, अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने बाजी मारत हे हक्क मिळवले. आता धर्मा प्रॉडक्शन आणि झी एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहे.

या चित्रपटाचे कथानक बऱ्यापैंकी ‘सैराट’सारखंच राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येणार आहेत. याच चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘सैराट’च्या हिंदी रिमेकद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगते आहे.

करण जोहर जान्हवीला वरुण धवनच्या अपोझिट ‘शिद्दत’ या सिनेमाव्दारे लॉन्च करणार असल्याची चर्चा याआधी रंगत होती. मात्र आता ‘सैराट’च्या रिमेकमध्ये करण जान्हवीलाच घेण्यास उत्सुक असल्याची माहिती धर्मा प्रॉडक्शनकडून मिळालीय. त्यामुळे गावरान आर्चीची सर करणच्या मॉर्डन आर्चीला येते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘सैराट’मध्ये आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरुने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. तिच्या गावरान भाषेनं तर महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला वेड लावलंय. त्यामुळेच रिंकूचीही लोकप्रियता बघता सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये आर्चीच्या भूमिकेत रिंकूलाच कास्ट करण्यात आलंय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here