पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा 2016 चा निकाल महापौर शकुंतला धराडे यांनी जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी-चिंचवड परिसरातील गणेश मंडळांमध्ये देखावा सजावट स्पर्धा घेण्यात आली. याचा निकाल आज महापौरांनी जाहीर केला. ही स्पर्धा धार्मिक, समाज प्रबोधन व जिवंत या तीन भागामध्ये घेण्यात आली.
धार्मिक : यामध्ये धार्मिक गटात प्रथम पारितोषिक चिंचवड येथील उत्कृष्ठ तरुण मित्रमंडळाला देण्यात आले. त्यांनी कालिका मातेकडून रक्तबीज राक्षसाचा वध हा देखावा सादर केला होता. तर व्दितीय पारीतोषिक भोसरी येथील समस्त गव्हाणे मित्र मंडळ यांचा गंगावतरण देखावा तसेच भोसरी येथील पठारे लांडगे तालीम मंडळ ज्यांनी खंडोबारायाचा विवाह सोहळा सादर केला होता. या दोन्ही मंडळांना तो विभागून देण्यात आला. तृतीय पारितोषिक पिंपरी गाव येथील आझाद मित्र मंडळ यांचा भक्त प्रल्हाद हा देखावा, तसेच भोसरी येथील छत्रपती शिवाजी तरुण मित्रमंडळ यांच्या मच्छींद्र नाथांचा जन्म हा देखावा सादर करणा-या या दोन मित्रमंडळात वाटून देण्यात आला.
जिवंत देखावा
यामध्ये प्रथम पारितोषिक चिंचवड येथील एस.के एफ. गणेशोत्सव मंडळाच्या एक लढा स्वातंत्र्यांचा आणि स्वदेशीचा या देखाव्यास मिळाले. तर व्दितीय क्रमांक चिंचवड गाव येथील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या अभिमन्यू नरसिंग यादव या देखाव्याला मिळाला. तर तृतीय क्रमांक चिंचवड येथील राष्ट्रतेज तरुण मित्र मंडळ तसेच रुपीनगर येथील दक्षता तरुण मंडळ या दोन्ही मंडळाच्या पावन खिंड या देखाव्याला मिळाले.
समाज प्रबोधन
या प्रकारात प्रथम पारितोषिक चिंचवड येथील लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळाच्या वृद्धाश्रम कशासाठी या देखाव्याला मिळाले. तर व्दितीय पारितोषिक भोसरी येथील श्रीराम मित्र मंडळाच्या प्रसार माध्यमांचे डोके ठिकाणावर आहे का? या देखाव्याला तसेच भोसरी येथील आझाद मित्रमंडळाच्या स्त्री अस्मिता या दोन देखाव्यांना विभागून मिळाले. तर तृतीय पारितोषिक चिंचवड येथील परशुराम मित्र मंडळाच्या स्त्री भ्रूण हत्या व तुकारामनगर येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या झाडे लावा-झाडे जगवा या दोन देखाव्यांना विभागून मिळाले. या स्पर्धेमध्ये एकूण 61 मंडळे सहभाग झाली होती. त्यापैकी 41 मंडळे बक्षिस पात्र ठरली. यामध्ये अनुक्रमे प्रथम पारितोषिक 30 हजार, व्दितीय पारितोषिक 25 हजार, तृतीय पारितोषिक 20 हजार, चौथा क्रमांक 15 हजार, पाचवा क्रमांक 10 हजार, उत्तेजनार्थ 4 हजार, असे बक्षिसाचे स्वरुप आहे. तसेच प्रत्येक सहभागी गणेश मंडळाला प्रमाणपत्र व एक हजार रुपये, असा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 3 लाख 60 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती.