पिंपरी : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
नागपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस प्रमोद निसळ, कार्यकारी सदस्य नंदू कदम, दीपक पाटील, दत्तात्रय गायकवाड, श्रीनिवास शेट्टी, जयदेव अक्कलकोटे आदी उपस्थित होते.
यशवंत भोसले एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष होते. 2007 मध्ये संत तुकारामनगर प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कामगार, व्यापारी, लघुउद्योग अशा विविध संघटनांवर ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर संचालक असून केंद्राच्या कामगार कायदे पुनर्गठण समितीवरही ते सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपदही भोसले यांनी भूषविले आहे. 2009 मध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्याचबरोबर भोसले यांनी सातारा जिल्हा विकास परिषदेची स्थापना करुन बचत गटांचे जाळे विणले आहे.