पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये होणार असल्याचे निश्चित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग व महापालिका निवडणूक विभाग यांच्याकडून जोरदार तयारी सुरु असून, महापालिका निवडणूक विभागाने 700 मतदारांसाठी 1 मतदान केंद्र या प्रमाणे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार मतदान केंद्र असणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांमध्ये एका मतदान केंद्रावर 750 ते 800 मतदारांप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत तिन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून 1200 मतदान केंद्र होती. मात्र, आता पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकीत 750 मतदारांप्रमाणे 1600, तर 800 मतदारांप्रमाणे 1500 मतदान केंद्रे आवश्यक आहेत. दरम्यान, महापालिकेने 700 मतदारांसाठी एक मतदान केंद्र असावे असे नियोजन केले आहे.
यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत दोन सदस्यीय पध्दत असल्याने मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागले. मात्र, आगामी निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागपध्दती असून चार नगरसेवक मतदारांना निवडून द्यायचे आहे. त्यामुऴे मतदारांना चार वेळा बटण दाबून मतदान करावे लागणार आहे. यासाठी अधिक वेळ खर्ची पडणार असल्याचे लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने आपल्या आधीच्या धोरणामध्ये बदल केला आहे. यामुळे महापालिका निवडणुकीसाठी आता सुमारे दोन हजा मतदान केंद्रे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्यांचे कामही अंतिम टप्प्यात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिका निवडणूक विभागाकडून मुळ मतदार व पुरवणी यादीतील मतदार एकत्रित करून प्रगानिहाय मतदार याद्या तयार केल्या जातील. त्यावर हरकती, सूचनांची कार्यवाही झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून 21 जानेवारी 2017 ला प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ट्रू वोटर अॅपच्या सहाय्याने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे सध्या महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी अॅपच्या सहाय्याने महापालिकेचे साडेसहाशे कर्मचारी प्रत्यक्ष मतदारांची खातरजमा करून पडताळणी करीत आहेत.
महापालिकेकडे विधानसभा मतदारसंघनिहाय 10 लाख 81 हजार मतदार असून सध्या याच मतदारांच्या प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार केल्या जात आहेत. निवडणूक विभागाला येत्या 15 डिसेंबरपर्यंत मतदार पडताळणीचे हे काम पूर्ण करायचे आहे. त्यानंतर त्याचे सविस्तर प्रस्ताव तयार करावे लागणार आहेत. तर,नव्याने मतदार नोंदणी झालेल्या मतदारांची पुरवणी मतदार यादी 5 जानेवारी 2017 रोजी निवडणूक आयोगाकडून प्रसिध्द होईल. त्यानंतर महापालिका निवडणूक विभागाने तयार केलेल्या मुळ मतदार आणि नोंदणी झालेले पुरवणी मतदार एकत्रित केले जातील. त्यानंतर महापालिका निवडणूक विभागाकडून 10 ते 15 जानेवारी या दरम्यान हरकती, सूचनांची कार्यवाही करून अनौपचारिक प्रभागनिहाय मतदार याद्या निवडणूक आयोगाकडे सादर केल्या जाणार आहे. पुढे निवडणूक आयोग 15 जानेवारीनंतर हरकती, सूचना मागवून त्यावरील कार्यवाही पूर्ण करेल. अखेर 21 जानेवारी 2017 रोजी आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या अंतिम प्रभानिहाय मतदार याद्या प्रसिध्द केल्या जातील.