शिवसेना आमदारांच्या पुतणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांची पुतणी अलिशा सुनील चाबुकस्वार हिने आज आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पार्टी कार्यालयात अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे पक्ष प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस फजल शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे खुद्द आमदारांच्याच घरातून बंडाळीला सुरूवात झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीमध्ये घरवापसीची पुन्हा एकदा सुरूवात झाल्याचीही चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अवघ्या 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. यावरून आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी बहुमताने विजयी होऊन विजयाची हॅट्रिक करेल, असा विश्वास त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केला आहे. गौतम चाबुकस्वार यांची पुतणी आलिशा ही इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. यांचा आज प्रभाग क्र. 21 मधून लढण्याकरिता तिचे वडील सुनील चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती व पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी अर्ज स्वीकारला.
पिंपरी गावठाण, पिंपरी कॅम्प, अशोक थिएटर, बालामाल चाळ, भीमनगर, वैभवनगर, जिजामाता हॉस्पिटल असे क्षेत्र असलेला प्रभाग क्रमांक 21 आहे. यात सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि अनुसूचित महिला असे आरक्षण आहे. सुनील चाबुकस्वार यांनी यापूर्वी 2012 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढविली होती.
सध्या राष्ट्रवादीतून भाजपकडे जाण्याचा रोख सुरू असताना खुद्द शिवसेना आमदारांच्या पुतणीनेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीसाठी हे आश्वासक चित्र असल्याचे दिसते.