पुणे : आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म फेस्टीव्हल (पीफ) यंदा 12 ते 19 जानेवारी 2017 या कालावधीत भरणार असून पिंपरी-चिंचवडमध्ये 13 ते 19 या सहा दिवसाच्या कालावधीत पीफचे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक आणि पीफचे अध्यक्ष व व्यवस्थापक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पक्षनेत्या मंगला कदम, महापालिका अधिकारी प्रवीण तुपे, यशवंत माने, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, यंदाचे हे पिंपरी-चिंचवड मध्ये 3 वर्ष आहे. गेल्यावर्षी साहित्य संमेलनामुळे आम्ही 6 दिवसांचा महोत्सव केवळ 3 दिवसांसाठी भरला होता. मात्र तेव्हा मिळालेल्या प्रतिसादावरुन तो यंदा 6 दिवस भरणार असून चिंचवड येथील कार्निव्हल (बीग सिनेमा) थिएटरमध्ये दोन स्क्रीनवर सिनेमे दाखवले जाणार आहेत.
तसेच 130 देशातून सुमारे 1 हजार 100 चित्रपट आले असून त्यापैकी 14 स्पर्धेत आहेत तर 80 चित्रपट बाहेर पडले आहेत. त्यापैकी 46 चित्रपट पिंपरी-चिंचवडमध्ये दाखवले जाणार आहेत. यंदा 13 तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.यासाठी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना पासच्या दरात सवलत असून त्यांच्यासाठी 600 रुपये शुल्क तर इतरांसाठी 800 रुपयांचा शुल्क आकारला जाणार आहे. नोंदणी www.piffindia.com
संकेतस्थळावर सुरु आहे. तेथे नोंदणी क्रमांक मिळेल तो क्रमांक घेऊन नागरिकांना मंगला थिएटर, आयनॉक्स (बंडगार्डन), सीटीप्राईड (कोथरूड), बीग सिनेमा (चिंचवड) येथे 29 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी साडेसहा वाजतापर्यंत प्रवेशशुल्क व ओळखपत्र दाखवून पास दिले जातील.