पुणे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे येथील साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कासारे शाखेचे अध्यक्ष व जैन संघाचे सचिव सुरेश पारख यांना 2016 या वर्षाच्या राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील जैन संदेश फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील सॅलीसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे आयोजित सोहळ्यात पारख यांचा सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली येथील ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक कुमार पगारीया, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, मुंबई येथील पारस मोदी, पुण्याचे विजयकांत कोठारी, जैन संदेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपादक सुभाषबाबू लुंकड, शोभा लुंकड, अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुरेश पारख यांनी सपत्नीक 31 वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दंतरोग तपासणी, सर्व रोग निदान शिबिर, औषधे, बसस्थानकावर मोफत पाणपोई, स्वाईन फ्लू जनजागृती, व्यवसनमुक्ती कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, मुलगी वाचवा-शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संतुलन, होळीची पोळी दान करा, फटाके विरोधी अभियान, अपंगांना मदत, विद्यार्थी व प्रवाशांना मदत, शाळेच्या वेळेनुसार बसेसची सोय करणे व शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे आदी कार्य सुरेश पारख यांनी केली आहेत. त्याची नोंद घेऊन त्यांना राज्यस्तरीय समारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.