पुणे दि.05 (प्रतिनिधी):- एकेकाळी काँग्रेसचा गड असणार्या पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला सध्या गळतीची लागण लागली आहे. गेल्या आठवड्यात सात नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची घटना ताजी असताना आता थेट महिला शहराध्यक्षा ज्योती भारती यांनीच पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे अध्यक्ष राजीनामा दिला आहे.
ज्योती भारती यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा चारूलता टोकस यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दोनदा सोपविण्यात आली होती. त्याप्रमाणे मी जबाबदारीने पक्षाचे काम देखील केले. परंतू आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीमध्ये पिंपरी चिंचवड काँग्रेस कार्ड कमिटी मला विश्वासात घेत नाही. या कार्ड कमिटीत माझा समावेश देखील करण्यात आलेला नाही. मी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक होते. पक्षाचा उमेदवारी अर्ज देखील घेतला होता. परंतू मला महिला अध्यक्षा म्हणून अपमानास्पद वागणूक दिली गेली. हा अन्याय माझ्यावरच न होता माझ्या महिला कमिटीवरील सर्व पदाधिकार्यांवर झाला आहे. त्यामुळे स्वताच्या इच्छेेने अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे भारती यांनी म्हटले आहे.
पक्षाची शहरात सध्या मोठी वाताहत सुरू झाली आहे. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि त्यांच्यासह सात समर्थक नगरसेवकांनी गेल्या आठवड्यातच गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता महिला अध्यक्षांनी देखील राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठा फटका बसला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती भारती यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.