राज्य प्युपील्स ऑलिंम्पिक स्पर्धेचे चिंचवडमध्ये शानदार उद्घाटन
पिंपरी (दि. 03 जानेवारी 2017) आई जिजाऊ यांनी बाल शिवाजींना ज्याप्रमाणे लढवय्ये बनविले, त्याप्रमाणे आजच्या पिढीतील प्रत्येक आईने आपल्या मुलास खेळासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रसंगी सक्ती करावी. त्यातूनच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, असा आशावाद क्रीडा भारतीचे सरचिटणीस राज चौधरी यांनी व्यक्त केला.
बालाजी कला-क्रीडा ट्रस्ट संचालित चिंचवड येथील स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स ॲकेडमीच्या वतीने आयोजित दुस-या राज्यस्तरीय प्युपील्स ऑलिंम्पिक स्पर्धेचे शानदार उद्घाटन स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.3 जानेवारी) चिंचवड येथील आहेर गार्डन क्रीडा संकुल येथे दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक संदीप कीर्तने, वैष्णव देव महाराज, ऑलिंम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर, मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजितसिंग कोचर, छत्रपती पुरस्कार विजेते राजू घुले, सुरेश घाडगे, प्युपील्स ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मेजर सुभाष ससाणे, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सायराबानू शेख, प्राचार्य हरमिंदर राय, ॲड सुनिल वाल्हेकर, ट्रस्टचे अध्यक्ष भरत वाल्हेकर, उपाध्यक्ष राजेश देवकर, सचिव इकबाल शेख, संचालक हेमंत चव्हाण, डॉ. संजय अव्हाळे, साहिल शर्मा, सुरेश घाडगे आदी उपस्थित होते.
राज चौधरी मार्गदर्शन करताना म्हणाले,‘‘ जागतिक सर्वेक्षणात आरोग्यामध्ये भारत देश 51 व्या क्रमांकावर आहे. ही देशासाठी खूपच चिंताजनक बाब आहे. आरोग्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी खेळाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या पाल्यास खेळांसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यातून अनेक खेळाडू निर्माण होऊन देश तंदुरुस्त आणि बलशाली होईल.’’
आमदार नितेश राणे म्हणाले,‘‘येथील आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू स्मिता वाल्हेकर हिला ज्या प्रमाणे व्यासपीठ मिळाले त्याप्रमाणे ग्रामीण भागांतील खेळाडूंना व्यासपीठ मिळून दिल्यास अनेक ऑलिंम्पिक पदक विजेते तयार होतील. यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. दोन-चार ऑलिंम्पिक पदकांवर दिवाळी साजरी करण्याची देशवासीयांची अल्पसमाधानी वृत्ती बदलून इतर देशाप्रमाणे 30 ते 40 पदके जिंकून पदकतालिकेत वरचे स्थान मिळविण्यात खरा आनंद मानला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम हाती घ्यावा.’’
ऑलिंम्पिक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर आणि वैष्णव देव महाराज यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ऑलिंम्पिक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा पुणेरी पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हॉकीत ऑलिंम्पिक सुवर्णपदक विजेते स्वर्गीय बाबू निमल यांचे ऑलिंम्पिक सुवर्णपदक त्यांचे चिरंजीव अजय निमल यांनी उपस्थितांना दाखविले. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडात उपस्थितांनी प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक राफेल नदाफ यांच्या स्पेन देशातील टेनिस प्रशिक्षण ॲकादमीत प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या 13 वर्षीय स्मिता भरत वाल्हेकर हिचा कार्यक्रमात विशेष सत्कार करुन तिला स्पेनला जाण्यासाठी निरोप देण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. दोन दिवशीय स्पर्धेस 15 जिल्ह्यातील विविध 12 गटांत तब्बल 3 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील लढतींना दुपारी सुरवात झाली. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, मुष्टियुद्ध, किक-बॉक्सिंग, तायक्वांदो, योगा, नृत्य, रांगोळी, गायन, तबला आणि हार्मोनियम वादन प्रकाराचा समावेश आहे. स्पर्धा आहेर गार्डन क्रीडा संकुल, यमुनानगर येथील मिनाताई ठाकरे स्केटींग हॉल, निगडी-प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान, मारुंजी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय मैदान येथे सुरू आहे.