पिंपरी : आगामी आर्थिक वर्ष 2017 -18 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका ऑनलाईन पद्धतीने कर भरणा-या करदात्यांसाठी एक चांगली ऑफर देऊ करणार आहे. त्यामध्ये एप्रिल ते जून 2017 या कावालधीत ऑनलाईन पद्धतीने मिळकतकर भरणा-या करदात्यांना महापालिका करामध्ये 5 टक्के सूट देणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत हा निर्णय घेतला गेला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. महापालिकेची आजची तहकूब करण्यात आलेली विशेष सभा होती. यावेळी आगामी 2017-18 या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ न करण्याचा विषय महापालिका सभेसमोर मांडण्यात आला होता. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मिळकत कराचा भरणा करणा-या करदात्यांना सवलत देण्याची उपसूचना मांडण्यात आली.
त्यानुसार 1 एप्रिल ते 30 जून 2017 या तीन महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने कर भरणा-या करदात्यांना 5 टक्के करात सवलत मिळणार आहे. तसेच 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 या नऊ महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करणा-या करदात्यांना मिळकत करात 2 टक्के सूट दिली जाणार आहे. नागरिकांनी कॅशलेसपद्धतीने अधिकाधिक करभरणा करावा यासाठी महापालिकेने ही स्मार्ट सवलत करदात्यांना दिली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले.