चिकसे : साक्री तालुक्यातील चिकसे-जिरापूर ग्रामपंचायतीने युनियन बँक ऑफ इंडियाच्या पिंपळनेर शाखेच्या सहकार्याने राष्ट्रियकृत बँकेत ग्रामस्थांचे खाते उघडण्याकामी पुढाकार घेतला आहे. मागील चार-पाच दिवसापासून या कार्यक्रमाद्वारे दोनशेपेक्षा अधिक खाती उघडण्यात आली आहेत.
साक्री पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या मार्गदर्शनाने गावपातळीवर कॅशलेस व्यवहारास गती मिळण्यासाठी पहिली पायरी म्हणून बँक खाते उघडण्याचे काम ग्रामसेवक पंकज पगारे यांनी सरपंच कल्पना माळीच व उपसरपंच संजय जगताप यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीमार्फत केले. यासाठी युनियन बँक पिंपळनेर शाखेचे मॅनेजर सुनिल कल्याणी, सतीष कचवे यांनीही सहकार्य केले. ग्रामसेवक पगारे यांनी सांगितले की, या खात्याचा उपयोग प्रधानमंत्री घरकुल, रमाई घरकुल, शबरी घरकुल, जननी सुरक्षा योजना, शौचालय बांधकाम, विधवा सहाय्य व इंदिरा गांधी वृद्धा नवृत्ती वेतन, अपंग कल्याण तसेच संजय गांधी निराधार योजनेत मिळणारी मदत व इतर शासकिय योजनांसाठी होणार आहे.
उपसरपंच संजय जगताप यांनी गावात 100 टक्के आधार कार्डधारक व 100 टक्के शौचालय बांधकाम या कामांवर भर देणार असल्याचे सांगितले. सध्या गावात अंगणवाडीपासून आधारनोंदणीची सुरूवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.