पुणे : नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून शेतकरी वर्ग देशोधडीला लागला आहे. मात्र पंतप्रधान केवळ स्वत:चे मार्केटिंग करण्यात मग्न असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुक्रमे 6 आणि 12 जागा आहेत. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

त्यानुसार या निवडणुकीत योग्य व्यक्तीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह महानगरपालिकांच्याही निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपल्याला राज्यभरात प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशात नोटाबंदीमुळे सर्वच स्तरातील घटक हैराण झाले आहेत. जिल्हा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा पडून आहेत. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयानतंरही केंद्र सरकार याबाबत काहीच उपाययोजना करत नाही. देशात उद्भवलेल्या या परिस्थितीबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाही. मात्र त्यांच्याकडून केवळ मार्केटिंग केले जात आहे. असा टोला पवार मोदींना लगावला आहे. यादरम्यान अजित पवार  भाषण सुरू असताना अचानक वीज  गेली. भरलेल्या सभागृहात माईक शिवाय बोलणे अशक्य होऊन बसले. ‘तू बॅटरी आणली असती, तर त्याचेही पैसे दिले असते’, असा टोला मंडपवाल्यालाही त्यांनी लावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here