पिंपरी, दि. २१ जानेवारी २०१७ – मतदार जनजागृतीसाठी शहरातील सर्व बँकांनी सहभाग घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीबाबत आज स्थायी समिती सभागृहात शहरातील बँक प्रतिनिधी यांचे समवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आचारसंहिता कक्षाचे प्रमुख सुरेश जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अण्णा बोदडे, मुख्यलेखापाल दिलीप लांडे, बँक ऑफ बडोदाचे पी.आर गवळी, जी. उन्नीकृष्णण, गणेश जाधव, अनिल कुमार सुतार, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्ही.व्ही. वडावहल, ए.डी. ननावरे, सेवा विकास बँकेचे कालिदास बी सुतार., कॅनरा बँकेचे जितेंद्र भालेकर, कॉसमॉस बँकेचे एस.ए.,जमादार, पिपंरी चिंचवड बँकेचे पी.जी. जंगम, बँक ऑफ इंडियाचे दीप सोनवणे, एचडीएफसी बँकेचे वैशाली बेलमकर, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सच्या प्रियंका महाजन, आयडीबीआय बँकेचे सुर्या बिहारी, पी.एन.बी बॅंकेचे अनिल आगरकर यांच्यासह 30 बँकेचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बँकेच्या अधिका-यांनी आपल्या विविध शाखांमध्ये मतदान जनजागृतीचे फलक, फ्लेक्स लावावेत तसेच एटीएम सेंटरवर मतदारांना आवाहन करणारे भिंतीपत्रक लावण्यात यावे. तसेच यावेळी एका प्रभागातून चार उमेदवार निवडून दयावयाचे असल्याने महापालिकेच्यावतीने त्याविषयी माहिती देणारे पत्रके बँक खातेदारांना वितरण करण्यासाठी बँकांकडून सहकार्य करणार असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिडीया सेलचे प्रमुख अण्णा बोदडे यांनी केले. डॉ. यशवंतराव माने यांनी निवडणूक कालावधीत बँकांनी करावयाच्या कामाची माहिती दिली.