पिंपरी, दि. २२ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा व शहराच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सायकल डे निमित्त आयोजित केलेल्या सायकलिंग रॅलीचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरयाचे अध्यक्ष विलासराव भोसले, सचिव कल्याणी कुलकर्णी, साहेबराव नाईक पवार, मेदनकर काका, तळेगांव विभागाचे विलास काळोखे, दादा हुरे, आकुर्डी विभागाचे विजय तारक, संतोष अगरवाल, भारत पेट्रोलीयमचे विभागीय व्यवस्थापक पवनकुमार, उपअभियंता बापू गायकवाड, अनिल शिंदे, सुनिल पवार, रोटरी क्लबचे पदाधिकारी आदींसह पिंपरी चिंचवड शहरातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. महानगरपालिकेमध्ये चांगले प्रतीनिधी निवडून दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत होईल. या बाबत सर्वांनी सजग राहून महानगरपालिकेस सहकार्य करावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांनी सायकलिंग रॅली हा स्तुत्य उपक्रम राबविवून जनमानसांमध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला आहे, असेही ते म्हणाले. सुमारे ४ कि.मी. अंतराच्या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता भक्ती शक्ती चौकातून आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. सायकल डे च्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांच्या वतीने लकी ड्रॉ पध्दतीने धवल देशमुख, सिध्देश सुभेदार, गायत्री वाघोडे या तीन विद्यार्थ्यांना आयुक्त दिनेश वाघमारे व रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरयाचे अध्यक्ष विलासराव भोसले यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीमध्ये मतदार व मतदान जनजागृती पत्रके माहिती व जनसंपर्क कक्षाच्यावतीने वाटप करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरयाचे अध्यक्ष विलासराव भोसले यांनी केले. तर आभार रोटरी क्लबच्या सचिव कल्याणी कुलकर्णी यांनी मानले.