अभियंत्यांच्या नव संकल्पनांतून स्मार्ट सिटीचा विकास : श्रावण हर्डीकर

पीसीएमसी, स्मार्ट सिटी कंपनी आणि पीसीसीओईमध्ये सामंजस्य करार

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ योजनेतंर्गत अनेक पायाभूत प्रकल्प सुरु आहेत. शहर स्मार्ट करताना ऊर्जा, आरोग्य, वाहतुकची साधने, घनकचरा व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन अशा सर्वसामान्यांना रोजच्या जीवनात भेडसावणा-या समस्यांवर परिणामकारक उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. ही गरज विचारात घेऊनच ‘इनोव्हेट फॉर स्मार्ट पिंपरी चिंचवड’ स्पर्धेतून अनेक नवीन प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. यामुळे नव्या संकल्पनांचे, नव्या विचारांचे अभियंते, संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध झाले. त्या नव संकल्पनांचा स्मार्ट सिटीसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी कंपनी  आणि पीसीसीओई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि पीसीसईटीच्या पीसीसीओई यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, तंत्रज्ञान विद्या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘इनोव्हेट फॉर स्मार्ट पिंपरी चिंचवड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या विजेत्या संघाचा गौरव आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आला. या वेळी महापालिकेचे संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, सिटी ट्रान्स्फोर्मेशन कार्यालयाच्या बार्बरा स्टंन कोव्हीकोवा, प्रा. राहुल पाटील आदी उपस्थित होते.

प्राचार्य फुलंबरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले लक्ष सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनात भेडसावणारे प्रश्नांवर पर्याय शोधण्यासाठी केंद्रीत केले पाहिजे. अशा प्रश्नांवर आपल्या नवीन संकल्पनातून कमी खर्चात, कमी मनुष्यबळात तर्कसंगत आणि परिणामकारक पद्धतीने उपाय शोधता आला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटल्यावर देशाचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन भारतदेश विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे डॉ. फुलंबरकर यांनी सांगितले.

बार्बरा म्हणाल्या की, उपलब्ध साधन साहित्याचा वापर करून नवीन संकल्पना, नवे संशोधन, नवे विचार अधिक परिणामकारक मांडण्यामध्ये भारतीय विद्यार्थी तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. त्यांच्या संशोधनाचा वापर विकासासाठी खूप उपयोग होतो. अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्र या विषयांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होत आहेत.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : घनकचरा व्यवस्थापन प्रथम – आशिर्वाद मौर्य (पीसीसीओई, आकुर्डी);ट्रान्सपोर्ट मोबिलिटी – प्रथम – अनिकेत घाडगे (डी.वाय. पाटील, आकुर्डी); आरोग्य – प्रथम – करण पाटील (एमआयटी आळंदी);ऊर्जा – प्रथम –  अभिषेक चौधरी (पीसीसीओई आकुर्डी); फायनान्स – प्रथम – अमित जोशी (आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नोलॉली).

विजेत्या स्पर्धकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर यांनी अभिनंदन केले.

या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहर, परिसरातील 27 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सुमारे 900 विद्यार्थ्यांनी 350 प्रकल्प मांडले. त्यापैकी 73 प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेचे परिक्षक म्हणून महापालिकचे विविध विभागांचे अधिकारी आणि महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रा. राहुल पाटील यांनी, सुत्रसंचालन प्रा. अनघा चौधरी यांनी केले. आभार प्रा. दीप्ती खुर्जे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here