पिंपरी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये, चिंचवड मतदार संघाची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांना तर भोसरी मतदार संघाची उमेदवारी आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा असताना भाजपने वाटाघाटी करत हा मतदार संघ आपल्याकडे ठेवला आहे.

शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केल्यानंतर चिंचवड आणि भोसरी मतदार संघाच्या उमेदवारीचा पेच वाढला होता. अखेर आज भाजपची पहिली यादी जाहीर झाल्याने चिंचवड आणि भोसरीच्या मतदार संघातील उमेदवाराचा संभ्रम दूर झाला आहे. चिंचवडची उमेदवारी विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना जाहीर झाली. तर, भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना भाजपने उमेदवारी देत या मतदार संघावरील शिवसेनेचा दावा फोल ठरविला आहे. त्यामुळे शहरातील केवळ एक जागा (पिंपरी) शिवसेनेला कायम राहिली आहे.

शिवसेना-भाजपची अघोषीत युती जाहीर झाल्यानंतर चिंचवड आणि भोसरीच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता. चिंचवडमधून शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते राहूल कलाटे तिव्र इच्छुक होते. त्यांना राष्ट्रवादीकडूनही ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, त्यांना युती न झाल्यास पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा होईल, असे वाटत होते. परंतु, युतीमध्ये चिंचवडची जागा आपल्याकडे ठेवत भाजपने जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राहूल कलाटे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

महायुतीच्या वाटाघाटीनुसार भोसरी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र, वरीष्ठ पातळीवरून भाजपने हा मतदार संघ आपल्याकडे ठेवत येथील अपक्ष आमदार लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक कामगार नेते इरफान सय्यद यांच्यावर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षावर विश्वास ठेवत प्रचाराला जोमाने सुरूवात केली होती. मात्र, आमदार लांडगे यांच्या उमेदवारीनंतर सय्यद महायुतीचा धर्म बाळगून काम करणार का, हा खरा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here