पिंपरी – एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री ९ च्या सुमारास विठ्ठल नगर झोपडपट्टीमध्ये घडली. तीन आरोपी अद्याप मोकाट आहेत. एकावर खाजगी रूग्णालयात उपचार सरू आहेत.
अजय बिराजदार (वय २३ रा मीरादाता गल्ली, विठ्ठलनगर, नेहरुनगर पिंपरी) दिनेश गायकवाड (वय २५) विशाल ऊर्फ बाळा आव्हाड (वय २३ रा. सायलीला हाउसिंग सोसायटी, विठ्ठल नगर पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज घोडके याने आरोपीच्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून अजय बिराजदार, दिनेश गायकवाड, विशाल उर्फ बाळा आव्हाड यांनी सुरज घोडके याला विठ्ठल नगर झोपडपट्टी मध्ये मिरा दत्ता गल्ली या ठिकाणी गाठून सुरज याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुरज घोडके गंभीर जखमी आहे. त्याच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी सुरज घोडके या तरुणावर देखील विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.