पिंपरी – पिंपरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादीची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली आहे. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा पक्षाकडून आपेक्षाभंग झाला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला असून सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँगेसने उमेदवारी दिली आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघातून सेलीब्रेटीला राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यात उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. त्यांनी नामनिर्देशन पत्र घेतले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच सस्पेन्स वाढला होता. शिवाय, माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. दोघांनी जोरात प्रचाराला सुरूवात केली होती. मात्र, राष्ट्रवादीने दुस-या यादीत पिंपरी मतदार संघातून सुलक्षणा धर यांचे नाव जाहिर केले.
मावळातून शेळके भाजपकडून इच्छुक होते. त्यावरून विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघाच्या गटात हाणामारी झाली होती. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील बहुतेक जागा जाहीर केल्या पण मावळची उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजप नाराजीचा फायदा घेण्यासाठी हे केले होते. बुधवारी रात्री भाजपने भेगडे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर शेळके यांचा निर्णय झाला. त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या बाळा भेगडे सतत दोन वेळा निवडून आले आहेत. त्यापूर्वी दोन निवडणुकात दिगंबर भेगडे भाजपचे आमदार होते. शेळके यांना उमेदवारी दिली असली तरी राष्ट्रवादीचे इतर इच्छुक काय भूमिका घेतात महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळेच ही जागा त्यांना कधीही जिंकता आलेली नाही. मदन बाफना यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर येथे विजय मिळविला होता.