पिंपरी | शिवसेनेचे नगरसेवक राहूल कलाटे चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर, दर्यापूर विधानसभेतून भाजपच्या पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे निवडणूक लढवित आहेत. या दोघांना पक्षाचा कसलाच पाठिंबा नाही. चिंचवडमध्ये शिवसैनिक राहूल कलाटे यांचे काम करणार नाहीत, बंडखोरी करणा-या या दोघांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होणार आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप, शिवसेना, आरपीआई (आठवले) व इतर घटक पक्षांच्या महायुतीची पत्रकार परिषद चिंचवडमध्ये पार पडली. त्यामध्ये खासदार बारणे बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे, गौतम चाबुकस्वार, चंद्रकांता सोनकांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, शिवसेना-भाजप महायुती असताना राहूल कलाटे पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना पक्षाचा कसलाही पाठिंबा नाही. शिवसैनिक त्यांचे काम कदापी करणार नाहीत. उलट दोनच दिवसांत त्यांच्यावर मातोश्रीवरून कारवाई होणार आहे. तर, दर्यापूर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे या निवडणूक लढवत आहेत. त्यांना सुध्दा महायुतीचा कसलाच पाठिंबा नाही. पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविणाऱ्या या बंडखोरांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाणार आहे, असेही बारणे म्हणाले.

जगताप म्हणाले की, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्यापुढे विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझीट सुध्दा राहणार नाही. तिन्ही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्का झाला आहे. आता निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे, असेही जगताप म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here