पिंपरी : विधानसभा निवडणुकीमध्ये शतकरी कामगार पक्ष राज्यस्तरावर महाआघाडीत सामील आहे. महाआघाडीतील जागा वाटपानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आला होता. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी कामगार पक्षाने पक्षाच्या एबी फॉमसह शेकापचे अधिकृत उमेदवार म्हणून छायावती चंद्रकांत देसले यांचा अर्ज भरला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चिंचवड विधानसभेत स्वत:चा उमेदवार उभा न करता जातीयवादी पक्षातून बंडखोरी केलेल्या उमेदवाराला ‘पुरस्कृत’ केले हे शेकापला मान्य नाही, असे पत्र शेतकरी कामगार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष नितीन बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात बनसोडे यांनी पुढे म्हटले आहे की, शेतकरी कामगार पक्षाचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करत आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाआघाडीचे तत्व डावलून अन्य उमेदवाराला पुरस्कृत केले. असा निर्णय घेताना शेतकरी कामगार पक्षाच्या कोणत्याही स्थानिक पदाधिका-यांना किंवा अध्यक्षांना विश्वासात घेतले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर पुरस्कृत उमेदवाराचे नाव जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र, चिंचवड विधानसभेतून शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार छायावती चंद्रकांत देसले यांचा अर्ज कायम आहे व त्या शेकापच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. छायावती देसले या शेकापच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला अध्यक्षा आहेत. शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते चिंचवड विधानसभेत शेकापच्या अधिकृत उमेदवाराचेच काम करतील. शेकापच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिका-यांचा चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवाराचा काहीही संबंध नाही. शेकापच्या उमेदवार छायावती देसले यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार गुरुवारी (11 ऑक्टोबर) थेरगाव येथील शेकापच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.