पिंपरी– भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्याकडून शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या निगडी, यमुनानगर येथील निवासस्थानी सोमवारी (दि. १४) बैठक झाली. या बैठकीत शिवसैनिकांनी भाजपच्या प्रचाराबाबत संतप्त भावना व्यक्त करत काम न करण्याचा इशारा दिला. आमदार लांडगे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गेले नाहीत, प्रचार पत्रकावर बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा वापर केला जात नाही, काही प्रचार पत्रकावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र जाणूनबूजून गायब केले जाते, अशा तक्रारी शिवसैनिकांनी बैठकीत केल्या. तसेच आमदार लांडगे यांचे काम करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाल्यात जमा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात दोन दिवसांपूर्वी जाहीर सभा झाली. या सभेला महायुतीचे उमेदवार म्हणून भोसरी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र आमदार लांडगे यांनी सभेला दांडी मारून थेट उद्धव ठाकरे यांनाच फाट्यावर मारले. त्यावरून शहराच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या. मात्र महेश लांडगे यांनी पुढे येऊन उद्धव ठाकरे यांच्या सभेला का गेलो नाही?, याचे अद्याप तरी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यावरून मातोश्रीसोबत चांगले संबंध नसल्यामुळेच महेश लांडगे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेला अनुपस्थित राहण्याची हिंमत दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला अनुपस्थित राहण्याची गंभीर चूक केल्यानंतर आता भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारात शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गृहित धरून जाणूनबूजून डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शिवसेनेमध्ये महेश लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यातून शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या निगडीतील निवासस्थानी भोसरी मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीला सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, धनंजय आल्हाट, निलेश मुटके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत शिवसैनिकांनी भोसरी मतदारसंघातील प्रचार पद्धतीवरून तीव्र संताप व्यक्त केला. भाजप उमेदवार महेश लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सरळसरळ डावलले जात असल्याचा राग शिवसैनिकांनी व्यक्त केला.
आम्ही जुना राग विसरून महेश लांडगे यांच्या प्रचारा कामाला सुरूवात केली होती. मात्र लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न केला. रॅलीच्या गाडीवर जाण्याचा पास आढळराव पाटील यांना सुरूवातीला नाकारण्यात आला. नंतर तो देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. हा अपमान आम्ही सहन केला. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला महेश लांडगे यांनी अनुपस्थित राहून ठाकरे साहेबांचा केलेला अपमान कसा विसरायचा, अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. एवढेच नाही तर मतदारसंघातील कोणत्याही सभा, प्रचार किंवा बैठकांमध्ये शिवसैनिकांना डावलले जाते. विश्वासात घेतले जात नाही. त्यांना शिवसेनेची गरज नसल्यासारखे वागत आहेत. शिवसैनिक लाचार होऊन आपल्या मागे येईल, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांचे काम करणार नसल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला. पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांच्या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचा शब्द दिला. त्यामुळे यापुढे भोसरी मतदारसंघात शिवसेना आमदार महेश लांडगे यांचे काम करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.