पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करणार्‍या आमदार लक्ष्मण जगताप यांना सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांनी जाहीर आव्हान देत प्रश्नांचा भडीमार केला आहे. प्रश्‍नांचे जाणीवपूर्वक भिजत घोंगडे ठेवून त्याच-त्याच प्रश्‍नांवर किती वेळा मतांचा जोगवा मागणार, असा सवाल करीत विकास कामे केली असतील तर दहा प्रश्‍नांची उत्तरे द्या, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गुरुद्वारा, चिंचवडेनगर परिसरातून रॅली काढली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, विकासासाठी पक्ष बदलल्याचे सांगत असताना 2004 ते 2014 या काळात त्यांनी कोणत्या पक्षाच्या माध्यमातून विकास कामे केली, आपण विधानपरिषद आणि विधानसभेत आपल्या आमदारकीच्या काळात किती प्रश्न मांडले. चिंचवड विधानसभेतील किती प्रश्न सोडविले, केवळ शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामाच्या मुद्याचे राजकारण आणखी किती दिवस करणार? चिंचवड मतदारसंघातील किती घरे अधिकृत झाली, शंभर टक्के शास्तीकर माफ झाला का? 24 तास पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाचे काय झाले? आता नव्याने पिंपळे गुरवमधल्या नागरिकांना स्वखर्चाने मिटर बसवावे लागणार आहेत की नाही? पिंपळे गुरवमधील डायनॉसॉर गार्डन दुबईमधील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर उभे केले जाणार होत, त्याचे काम अर्धवट असताना तसेच उद्यान बंद असतानाही त्याचे निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन का केले?, कचरा गोळा करण्याच्या नावाखाली प्रत्येक कुटूंबाकडून साठ रुपये कशासाठी? नागरिकांवर भूर्दंड टाकून ठेकेदार पोसण्याला कोणाचा आर्शिवाद आहे? महापालिकेतील ठेकेदारी, भाचे, नातेवाईकांना देऊन त्यांना कोणी मोठे केले? महापालिकेत ठेकेदारी करायला सांगवी, पिंपळे गुरवमधील एकही गाववाला आजपर्यंत का पात्र ठरला नाही? आपले नातेवाईकच पात्र कोणाच्या आर्शिवादाने ठरत आहेत? तुमच्या कार्यालयात येताना नागरिकांना भीत भीत का यावे लागते? लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात जनतेपेक्षा ठेकेदार मोठे झाले हे खरे नाही का? सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरवमधील पूरग्रस्त नागरिकांना आजपर्यंत शासनाची मदत का मिळाली नाही? मतदारसंघाच्या विकासाचा दावा केला जात आहे तर मग कचरा आणि पाण्याची समस्या इतकी तीव्र का झाली? ज्या भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आल्यानंतर शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा दावा आपण करता हा प्रश्न कोणाच्या काळात सुटला? त्याची तारिख आणि त्यावेळचे सरकार कोणाचे होते? इतरांनी मार्गी लावलेल्या विषयांचे श्रेय आपण लाटत नाहीत का आदी सवाल राहुल कलाटे यांनी केले आहे.

चिंचवड मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या मनात यासह अनेक प्रश्न आहेत? महापालिकेतील ठेकेदारी, नगरसेवकांवरील बॉसगीरी, टीडीआर, रस्त्यांची दुरावस्था, कचर्‍यातून मिळणारी मलई यासह अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. वरील प्रश्नांची उत्तरे दिल्यास जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि निखळ वातावरणात निवडणुका पार पडतील, असे कलाटे यांनी म्हटले. मतदारसंघातील प्रश्न तसेच जनतेच्या मनातील विषयांना कलाटे यांनी हात  घातल्यामुळे चिंचवडमधील राजकीय वातावरणात रंग भरू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात कलाटे यांनी जनतेशी संवाद साधत त्यांना आपलेसे केल्यामुळे मतदारसंघातील मतदारांचा कलाटे यांना पाठिंबा वाढत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अयशस्वी ठरलेले जगताप उत्तरे देणार की आणखी भूलथापाच देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवड, गुरुद्वारामध्ये कलाटे यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी, महिला, भगिनींकडून होणारी ओवाळणी आणि कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणार्‍या घोषणांमुळे रॅलीमध्ये उत्साही वातावरण होते. परिसरातील मतदारांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला होता. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या, असे आवाहन कलाटे यांनी केले. मतदारांनीही या आवाहनला प्रतिसाद देत यंदा परिवर्तन अटळ असून कलाटे यांनाच साथ देणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here