पिंपरी :- सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जात असून माणुसकी नसलेले भाजप-शिवसेना सरकार आहे. मस्तवाल होऊन बेभान सुटलेल्या या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर देखील त्यांनी सडकून टीका केली.

यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड भोसरीचे उमेदवार शहानवाज शेख, चिंचवडचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ पिंपरीत बुधवारी आयोजित केलेल्या सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी वंचितचे महासचिव सचिन माळी, अनिल जाधव, प्रा. नामदेवराव जाधव, गायक उत्कर्ष शिंदे, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, वंचित युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना सरकारने मदत केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवाई पहाणी करतात. तर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सेल्फी घेतात. भाजप सरकारमधील मंत्री माणुसकी नसलेले आहेत. मदत करण्याबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मदत करण्याबाबत विचार करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता या सरकारला विचार करण्यासाठी घरी पाठवा, असे सांगत अॅड.आंबेडकर म्हणाले, निवडणूक आली की भावनिक करतात. मते आणि सत्ता मिळाली की जनतेला विसरून जातात. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ असताना चारा छावण्या लवकर सुरू केल्या नाहीत. अडचणीच्या काळात सरकारने मदत करने अपेक्षित असते. पण, हे सरकार उभे राहत नाही. या मतदारसंघातील व केंद्रातील दादागिरी चालणार नाही. इतर राज्याच्या निवडणुकीत यश येत नाही हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉम्बस्फोट होईल अशी, नवीन टूम काढली. मात्र, हे संगण्याअगोदर ब्लास्ट करणाऱ्यांना पकडा. निवडणुकीतच देशाला धोका कसा होतो?. आरएएसच्या रेड्डी नावाच्या माणसाने ब्लास्ट केले असल्याचे कबूल केले आहे. आरएसएसचे मोहन भागवत यांना हे माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी हे विधान केले त्यांना पोलिसांनी बोलवलं नाही.निवडणुकीत भावनात्मक करून मत मिळवतात. सत्ता घेतात आणि विसरतात.

बीड, लातूर, सोलापूर मध्ये दुष्काळ होता. जानेवारी, मार्च मध्ये छावण्या सुरू होणे गरजेचे होते. मात्र या छावण्या पावसाळ्यात सुरू झाल्या. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीच देशातील अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याचे सांगत आहे. दोन बँका बुडाल्या आहेत. आणखीन पाच बँका बुडणार असल्याचे भाकीत करत आंबेडकर म्हणाले, सरकारचा घोडा उधळला आहे. त्याला लगाम घालण्याची गरज आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी वंचित आघाडी आणि पुरस्कृत उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here