पिंपरी:- खडकीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलीसच नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनत आहे. या प्रश्नाकडे खडकी बोर्ड आणि वाहतूक शाखेने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खडकी बोर्डाच्या हद्दीतून जात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर वाहतूक कोंडी दररोजची होऊन बसली आहे. या भागात दारुगोळा कारखाना, आर्मी वर्क्स शॉप, एचई फॅक्टरी, सीएफव्हिईडी यासारखे कारखाने आहेत. त्यात काम करणारे अनेक कामगार खडकी, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, येरवडा, कळस, दिघी या भागातून कामासाठी येतात. दररोज संध्याकाळी या कारखान्यांतून कामातून सुटल्यावर कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी डॉ. आंबेडकर रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे संध्याकाळी कामगारांची गर्दी वाढते. याबरोबरच पिंपरी-चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, तसेच येरवडा भागातून ये-जा करणारी वाहने या रस्त्याचा वापर करत असतात. अशा वाहतूक कोंडीमुळे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, ज्येष्ठांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनत आहे. तसेच स्थानिकांचीही रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. स्थानिक नगरसेवकांचेही या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खडकी परिसरात कामासाठी येत असलेल्या कामगारांना दररोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी बहुतांश वेळी वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे वाहनचालक आपली वाहने कशीही दामटतात. परिणामी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होऊन स्थानिक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

रामभाऊ जाधव, छावा मराठा संघटना, पुणे जिल्हाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here