पिंपरी चिंचवड  पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या जेष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे (वय 34) यांनी काल (गुरूवारी) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात. दैनिक केसरीतून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीस सुरूवात केली होती. ‘लोकसत्ता’च्या ‘पिंपरी-चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्या नियमित लेखन करायच्या. ‘एमपीसी न्यूज’मध्ये त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. ‘एमपीसी न्यूज’च्या मुख्य वार्ताहर पदाची धुराही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. पुढे ‘पीसीबी टुडे’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शेवटी दैनिक ‘प्रभात’मध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या.

काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी निशा पाटील-पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले अाहे. पोलिसांनी निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे याला ताब्यात घेतले आहे. निशा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आज, शुक्रवारी (दि.१) सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी, उंब्रज नंबर १, तालुका जुन्नर, येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here