पिंपरी-चिंचवड – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल महिनाभर महापालिकेच्या कामकाजाचा खोळंबा झाला. त्यातच सलग 5 दिवस सुट्ट्या मिळूनही महापालिका अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या मूडमधून बाहेर आले नाहीत. त्यामुळे सुट्ट्या संपल्या तरी महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवक, ठेकेदार, कार्यकर्त्यांचा कायम राबता असतो. अधिकारी, कर्मचारी, नागरिकांमुळे महापालिकेची दालने गर्दीने फुललेली असतात. विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. 21 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली होती. महापालिकेचे बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाची वाणवा होती. त्यातच पदाधिकारी, नगरसेवक महापालिकेकडे फिरकले नाहीत.
निवडणुकीचा निकाल लागताच दुसऱ्या दिवसापासून दिवाळी सुरु झाली. 25 ते 29 ऑक्टोबर अशा सलग पाच दिवस महापालिकेला दिवाळी सणानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. महापालिकेचे कामकाज पूर्ववत सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, सुट्टीच्या मूडमध्ये असलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘दांडी’ मारली. त्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पसरला होता.