पुणे – महाराष्ट्रात सरकार कुणाचे येणार? हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे सरकारवर चहुबाजूंनी टीका सुरू आहे. राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण झाली, तर पुढे जाऊन संसार कसा नीट होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला.

बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपचे धाडस झाले असते का?

‘महाराष्ट्राला लाभलेल्या काही नेत्यांबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक आहेत. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचे वजन होते. निवडणुकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला दिला. मात्र, सध्या भाजप आपला शब्द फिरवत आहे. हे सर्व काही बघून हाच प्रश्न पडतो की, बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर भाजपचे एवढे धाडस झाले असते का?’ असा सवाल रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे.राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशिर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला. आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे. मात्र, भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढील ५ वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे. त्यामधून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत असेच दिसत आहे. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण झाली तर पुढे जाऊन संसार कसा नीट होणार?, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here