मुंबई – आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पण हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या निकालावर दिली आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, ”अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याचं आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार!” यासोबतच लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

”आता लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी आणि ‘रामराज्य’ देखील यायला हवं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या अनेक दशकांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here