एमआयडीसीतील प्रश्‍न सुटेना; अधिकार्‍यांसोबत चर्चा

पिंपरी चिंचवड ः वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाले आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर बदलण्याची मागणी करत वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती वजा मागणी महावितरणकडे केली आहे. लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या गणेशखिंड कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. संघटनेतर्फे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांना पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज विषयक समस्याबाबत निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात संचालक नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, विजय भिलवडे, सूर्यकांत पेटकर, विकास नाईकरे, तसेच अनेक उद्योजक उपस्थित होते. भोसरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.बी.भरणे, उमेश दवडे, चौधरी अधिकारी देखील उपस्थित होते.

अशा आहेत संघटनेच्या मागण्या…

देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन ती पूर्ण करावीत. वीज वाहिन्यास अडथळा ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तातडीने काढाव्यात. मोडकळीस आलेले फिटर फिलर बदलावेत. देखभाल-दुरुस्ती वेळच्या वेळी करावी. केबल दोष शोधणारे वाहन पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत. केबल जोडणारी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. भोसरी सब स्टेशन-2 पेठ क्रमांक 7 मधील फीडर क्रमांक 1 साठी बे ब्रेकर बसवावेत, अशा विविध मागण्या उद्योजकांनी केल्या आहेत.

जादा क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे आदेश…

अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी विभागवार वीज वाहिनीला अडथळा ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडण्याचे, टीपीमधील फ्युज वायर व इतर साहित्य व्यवस्थित बसवण्याचे, तसेच जादा क्षमतेचे रोहित्र बसवण्याचे आदेश दिले. पिलर फिडर क्लिपिंग करणे आदींबाबतची अधिकार्यांना सूचना दिल्या. औद्योगिक परिसरात देखभाल दुरुस्तीसाठी मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करुन देण्यात आश्‍वासन अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यानी यावेळी दिले. उद्योजकांना महावितरणकडून नेहमीच सहकार्य केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here